
भारताची इंग्लंडवर 171 धावांची आघाडी!

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगलीच मुसंडी मारली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (127) शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या (61) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित 40 मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 270 धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला 171 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली (22) आणि रवींद्र जाडेजा (9) नाबाद आहेत.
दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने 83 धावांची सलामी दिली. 46 धावांवर असताना लोकेश राहुल जेम्स अँडरसनची शिकार ठरला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने दिडशतकी भागीदारी करत भारताला आघाडी मिळवून दिली. रोहितने आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं 10 वं आणि परदेशातलं पहिलं शतक ठोकलं. त्याने 127 धावांची खेळी केली. तर पुजाराने 61 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ऑली रॉबिन्सनने एकाच षटकात या दोघांनाही बाद करत इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवू दिला. मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने विकेट जाऊ दिली नाही.
रोहितचं परदेशातलं पहिलं कसोटी शतक!
इंग्लंड दौऱ्यावर भारताचे इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, तर रोहित शर्मा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले.
पुजाराचीही फटकेबाजी!
चेतेश्वर पुजारा धिम्या गतीने धावा जमवतो, त्याच्या स्ट्राईक रेटवरुन त्याला नेहमीच ट्रोल केलं जातं. अनेकद्या त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील होते. मात्र आजच्या डावात पुजारा वेगळ्याच फॉर्ममध्ये होता. त्याने 127 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. त्याने रोहितसोबत दिडशतकी भागीदारी केली. पुजाराने आज काही आक्रम फटकेदेखील लगावले. पुजारासोबत लोकेश राहुलनेदेखील चांगली सुरुवात करुन दिली. त्याला त्याचं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. मात्र त्याने रोहित शर्मासोबत 83 धावांची भागीदारी केली. वैयक्तिक 46 धावांवर तो बाद झाला.
भारत आणि इंग्लंडला पहिला डाव!
दरम्यान, भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. आधी कर्णधार विराट कोहलीचं (50) अर्धशतक आणि अखेरच्या काही षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने (57) जोरदार फटकेबाजी करत ठोकलेलं अर्धशतक, याच्या जोरावर भारतीय संघाने कशीबशी 191 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातदेखील चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने चौथ्याच षटकात इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर बाद करत भारताची स्थिती मजबूत केली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपायला एकच षटक बाकी असताना उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद करत दिवसाची गोड सांगता केली. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात आक्रमक मारा केला.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडची अवस्था 5 बाद 62 अशी झालेली असताना मात्र ऑली पोपने (81) मोर्चा सांभाळला. त्याने जॉनी बेअरस्टो (33), मोईन अली (35) या दोघांसोबत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचत इंग्लंडला सुस्थितीत नेऊन ठेवलं. अखेरच्या षटकात ख्रिस वोक्सने अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला 290 धावांपर्यंत मजल मारुन दिली. भारताकडून या डावात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळवली.