बांदा | राकेश परब – ता. १६ : वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना आज गुरुवारी सात दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ या जयघोषात बांदा दशक्रोशील दीड दिवसाच्या बाप्पांचे आज विसर्जन करण्यात आले. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावांत तलावाची सफाई केलेले पहावयास मिळाले.
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’…’एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, या जयघोषांसह बांदा दशक्रोशीतील सात दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नियम पाळत शुक्रवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले होते. आज सातव्या दिवशी गुरुवारी दुपारनंतर कोरोना नियमांचे पालन करत गणपती मूर्तीचे भावपूर्ण वातावरणात रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले.