Advertise here + 91 9322570331

परशुराम उपरकरांनी व्यक्त केली खंत… !

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे पर्यटक क्षेत्रातील विविध व्यावासयिकांचा सन्मान…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २८ : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हाम्हणून घोषित झाला असताना देखील केवळ शासनकर्त्यांच्या दुर्लक्ष व उदासीन धोरणामुळे जिल्ह्यात पर्यटन बहरू शकले नाही. पर्यटन जिल्ह्याला पर्यटन अधिकारी नाही. सिंधुदुर्गात जे पर्यटन वाढत आहेत ते केवळ स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमुळे आहे. या व्यावसायिकांना पाठबळ देण्याऐवजी त्यांची विविध गोष्टींमध्ये अडवणूक करण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. शासनकर्त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पर्यटन क्षेत्राला वाईट दिवस आले. ही परिस्थिती बदलण्यासाठी पर्यटक व्यावसायिकांनी एकत्र येऊन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविल्या पाहिजेत. जिल्ह्यातील पर्यटनाच्यावृद्धीसाठी पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍यांना सर्वतोपरी सहकार्य मी करेन, अशी ग्वाही मनसेचे सरचिणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगीते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष समीर नालवडे, प्राध्यापक हरिभाऊ भिसे, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव नितीन तळेकर, खजिनदार यशवंत आमोनिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे उपरकर म्हणाले, पर्यटन क्षेत्रातून अनेकांना रोजगार मिळू शकतो. पर्यटनावर आधारित अनेक प्रकल्प राबविले पाहिजेत. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे हे प्रकल्प राबविले गेले नाहीत. त्यामुळे जिल्हा पर्यटन क्षेत्रात पिच्छाडीवर गेला आहे. विशेष म्हणजे पर्यटन जिल्हा असताना देखील पर्यटन अधिकारी नाही. जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांसाठी मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहण्याकडे पाठ फिरवत आहेत. कोरोनामुळे दीड वर्षे व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर पर्यटक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देऊ लागले आहेत. यांचा फायदा व्यावसायिकांनी घेऊन त्यांना दर्जेदार सुविधा द्याव्यात. जेणेकरून पुन्हा पर्यटनाला चालना मिळेल.

समीर नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायत देखील पर्यटनाच्यादृष्टीने पर्यटन महोत्सव आयोजित करत असतो. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विविध पर्यटन विषयक उपक्रम जिल्ह्यात राबविले पाहिजेत. गोवा पर्यटनाच्या दृष्टीने पुढे गेला आहे. त्या तुलनेत आपण मागे राहिलो आहोत.कणकवली नगरपंचायतीतर्फे गणपती साना येथे भव्य असा नेसर्गिक धबधबा निर्माण करण्याचे काम काही महिन्यात हाती घेण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढार्‍यांनी एकत्र येऊन पर्यटक क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यापार्‍यांना मदत करावी व पर्यटनाला चालना द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रा. हरिभाऊ भिसे यांनी जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनतर्फे सिंधुदुर्ग टुरिझम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बेस्ट ग्रो टुरिझम पुरस्कार मामाचो गावचे मालक अनंत सावंत, बेस्ट हॉटेल टुरिझम पुरस्कार हॉटेल साई सुरभीचे मालक विजय गावडे, सावंतवाडी बेस्ट फूड टुरिझम पुरस्कार आरेकर्स रेस्टॉरंटचे मालक नीलेश आरेकर, बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम पुरस्कार ग्रीन ग्रास रिसॉर्टचे मालक विष्णू चव्हाण, बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम पुरस्कार दादा वेंगुर्लेकर बीच हाऊसचे मालक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, बेस्ट हॉस्पिलट्यालिटी टुरिझम पुरस्कार वृंदावन रेसिडेन्सी न्याहारी व निवासचे हेमंत चोपडेकर, बेस्ट इको टुरिझम अँड व्हिडिओग्राफी पुरस्कार कोकणी रान माणूस इको टुरिझमचे प्रसाद गावडे, बेस्ट बँक वॉटर टूरिझम पुरस्कार महालक्ष्मी वॉटर स्पोर्टस्चे राजन कुमठेकर, बेस्ट गाईड टुरिझम पुरस्कार गणेश टुरिझम गाईड सर्व्हिसेसचे गणेश पाडगांवकर, बेस्ट मेडिकल टुरिझम पुरस्कार आजोळ ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन केंद्राचे डॉ . विवेक एकनाथ रेडकर, बेस्ट साहस शौर्यवीर पुरस्कार मालवण आपत्कालीन ग्रुप मालवण बंदर जेटी, मालवण संस्थेला देण्यात आला. आरंभी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत चंद्रशेखर उपरकर, नितीन तळेकर, यशवंत आमोनिकर यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर उपरकर यांनी केले. तर आभार यशवंत आमोनिकर यांनी मानले

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here