आ. वैभव नाईक यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २५ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मंत्रालयात भेट घेऊन कुडाळ शहरामध्ये नवीन सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी केली त्यावर ना. बाळासाहेब थोरात यांनी येत्या सोमवारी याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

कुडाळ शहराचा झपाट्याने विकास होत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासात्मक बांधकामे सुरु आहेत. तसेच कुडाळ शहरामध्ये अनेक विकासक मोठ्या प्रमाणावर शहरासह आसपास च्या भागात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना मिळकती संबंधित व्यवहार, दस्त नोंदणी आदी कामे करताना सुलभ व्हावे यासाठी कुडाळ तालुक्यात शहराच्या ठिकाणी सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय असावे अशी आग्रही मागणी नागरीकांची आहे. मात्र पूर्वी कुडाळ मध्ये असलेले सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय हे ओरोस येथे स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे कुडाळ शहरामध्ये नवीन सहाय्यक जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुरू करावे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेऊन ना. बाळासाहेब थोरात यांनी येत्या सोमवारी याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here