
उर्वरित ७ ग्रा. पं. चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…!
अर्ज भरण्यासाठी उमेदवार, कार्यकर्त्यांनी धावपळ…!

कणकवली – अनिकेत उचले : कणकवली तालुक्यातील ५८ ग्रा.पं.च्या सरपंच, सदस्यपदाचे अर्ज दाखल करणाऱ्या शेवटच्या दिवशी उमेदवार व कार्यकर्त्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून अाले. ५८ पैकी ५१ ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी १९६ तर सदस्य पदासाठी ९८० अर्ज दाखल झाले. उर्वरित ७ ग्रा. पं. चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, तालुक्यातील शिडवणे, वायंगणी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या अाहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले होते.
ग्रा.पं. निवडणुकीसाठी उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कणकवली तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी दिवसभर मोठी गर्दी पहायला मिळाली. कार्यालयाचा परिसर दुचाकी, चारचाकी वाहनांनी भरुन गेला होता. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. सायंकाळपर्यंत ही गर्दी कायमच होती. ऑफलाईन अर्ज स्विकारले जात असल्याने आयत्या वेळी सुध्दा काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. सायंकाळी ५.३० वा. हा कक्ष नव्याने येणार्यांसाठी बंद करण्यात आला. मात्र तत्पूर्वीच मोठया संख्येने उमेदवार कक्षात दाखल असल्याने त्यांचे अर्ज स्विकारण्यासाठी रात्रीचे ८ वा. पर्यंत प्रक्रिया सुरु होती. ८ वा. पर्यंत ५१ ग्रा.पं.च्या दाखल उमेदवारी अर्जांची माहिती प्राप्त झाली होती. या ५१ ग्रा. पं.साठी शुक्रवारी दिवसभरात सरपंच पदासाठी १२२ तर सदस्य पदासाठी नवीन ६१५ अर्ज दाखल झाले. एवढया मोठया संख्येने एकाच दिवशी अर्ज स्विकारण्यासाठी निवडणुक अधिकार्यांना कसरत करावी लागली.
तालुक्यातील काही ग्रा.पं.मध्ये शिवसेना-भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. तर काही ग्रा.पं.मध्ये गाव पॅनलचाही प्रयोग करण्यात आला आहे. बहुतांशी गावांमध्ये सरपंच पदासाठी ५ ते ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज छाणणीमध्ये बाद होण्याची भिती असल्याने काही गावांमध्ये डमी अर्जही भरण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी लक्ष देऊन होते. काही पदाधिकार्यांनी तर शुक्रवारी दिवसभर तहसील कार्यालयाच्या परिसरात तळच ठोकला होता. एकूणच सरपंच, सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.