
आम.वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला…!

कणकवली – अनिकेत उचले : सिंधुदुर्ग बदलतोय या टॅगलाईनखाली भाजपने आंगणेवाडीत मेळावा घेतला मात्र सिंधुदुर्ग एवढ्यासाठीच बदलतोय की सिंधुदुर्गात पुन्हा राडे सुरू झाले आहेत. 30-30 कोटी दंड झालेले शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचा दंड माफ होत आहे आणि 100 सर्वसामान्य वाळू व्यावसायिकांना दीड दीड लाखांचे दंड झाले आहेत. त्यांच्यावर सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी दबाव आणला जात आहे. सुमारे 100 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. सूडाच्या राजकारणासाठी सिंधुदुर्ग बदलतोय काय? असा टोला शिवसेना आ. वैभव नाईक यांनी भाजप आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना लगावला. आगामी लोकसभा असो की विधानसभा निवडणूका आम्ही ताकदीने लढू, जनता आमच्यासोबत आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंगणेवाडी येथील मेळाव्यात भाजप नेत्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला आ. वैभव नाईक यांनी सोमवारी येथील विजयभवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, यात्रेदिवशी भाजपने जो आनंदमेळावा घेतला होता तो नेमका कशासाठी होता? भाविकांना मानसिक त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न होता की राणेंना राजकीय निरोप देण्यासाठी होता? की आपण न केलेली कामे लोकांसमोर सांगण्यासाठी होता? आंगणेवाडी यात्रेला राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी येतात. त्यामध्ये मुंबईतील चाकरमान्यांचा मोठा सहभाग असतो. या भाविकांच्या माध्यमातून आंगणेवाडी यात्रेची महती सर्वदूर पसरली आहे. असे असताना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना मानसिक त्रास देण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला आमचा विरोध नव्हता आणि प्रशासनानेही परवानगी दिली होती. मात्र या मेळाव्यामुळे पाच पाच तास ट्राफिकमध्ये अडकावे लागले अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यापुढील काळात असे राजकारण होऊ नये अशी अपेक्षा लोकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.
ते म्हणाले, सिंधुदुर्गातील रस्ते विकासाची जवळजवळ 100 कोटींची कामे आमच्या काळात विशेष दुरूस्तीमधून घेण्यात आली होती. त्यातील बहुतांशी कामे पुर्ण झाली आहेत. आंगणेवाडीत जाणारे दोन मुख्य रस्ते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाले आहेत. कालच्या मेळाव्याला बहुतांशी राणे समर्थक होते. जशी पूर्वी काँग्रेसला सूज आली होती तशी आता भाजपला आली आहे. पूर्वी राणे ज्या ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांचा शब्द चालत असे, मात्र कालचा मेळावा हा राणेंच्या परवानगीशिवाय झाला, त्यामुळेच त्यांची खदखद बाहेर पडल्याचे दिसून आले. आशिष शेलार हे मुंबई मनपावरून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मात्र हिंमत असेल तर त्यांनी मुंबई मनपाची निवडणूक लढवावी. निवडणूकीची तारीख जाहीर करावी, मग मुंबईतील मराठी माणूस कोणाबरोबर आहे हे दिसून येईल. नारायण राणे म्हणतात, विरोधकांनी बालवाडीसुध्दा स्थापन केली नाही, मात्र आम्ही कॉलेजेस सुरू करून दाखविल्याने राणेंचा तो आरोप जुना झाला आहे. सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाले आहे, हायवेच्या कामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. राणे म्हणतात आठ वर्षांचा बॅकलॉग भरावयाचा आहे. गेल्या अडीज वर्षापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मोदी आठ वर्षांपासून पंतप्रधान आहेत. मग त्यांनी काहीच केले नाही असे राणेंना म्हणायचे आहे काय? राणे यांनी केंद्रीयमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात किती उद्योग आणले ते सांगावे. राणे आमच्यावर कमिशन घेतल्याचे आरोप करत आहेत, मात्र त्यांचाच मुलगा नितेश राणे यांचा नाणार प्रकल्पाला पूर्वी विरोध होता, आता मात्र ते नाणार प्रकल्पाचे समर्थन करत आहेत. मग कमिशन नेमके कुणाला मिळाले? असा सवाल आ. वैभव नाईक यांनी केला. आमच्यावर दबाव असूनसुध्दा आणि पोलिसांच्या कारवाया सुरू असूनसुध्दा आम्ही पक्ष सोडला नाही. मात्र राणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलला. आज प्रशासनात महत्वाच्या अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. हाच सिंधुदुर्ग बदलतो आहे का? याचा विचार जिल्ह्यातील जनता करेल. आंगणेवाडी यात्रेमध्ये कुणी राजकारण करत असेल तर लोकांचा रोष दिसून येईल असेही आ. नाईक म्हणाले. मालवण नळयोजनेचे 40 कोटींचे काम आम्ही मंजूर केले आणि ते निविदा स्तरावर आहे त्यामुळे त्यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. राणेंना प्रत्येक विकासकामात भ्रष्टाचारच दिसतो. आशिष शेलार हे 20 वर्षे भाजपच्या माध्यमातून मुंबई मनपात सत्तेत होते, मग आमच्यावर आरोप करणारे ते स्वतः भुरटे चोर नाहीत का? असा सवालही आ. नाईक यांनी केला.