

कणकवली – अनिकेत उचले : सिंधुदुर्गात लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा सी वर्ल्ड प्रकल्प, नाणार रिफायनरी प्रकल्प आणि चिपी विमानतळाला शिवसेनेचे खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांनी विरोध केला होता. जिल्ह्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम त्या दोघांनी केले. त्यामुळे त्यांना भाजपवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही. आंगणेवाडी यात्रेतील सभेचा प्रपंच हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातूनच केला होता. यात्रेमुळे एकाच मंचावर सर्व नेतेमंडळी येऊ शकली. तरीही भाविकांची गैरसोय झाली असेल तर आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. पुढील काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या पर्यटनासह सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला.
कणकवलीतील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलु सावंत उपस्थित होते. राजन तेली म्हणाले, ना. राणेंच्या उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून 200 कोटीचे ट्रेनिंग सेंटर जिल्हयात होणार आहे. तसेच येत्या बजेटमध्ये भरीव तरतूद करून सिंधुदुर्गच्या विकासाला पैसे कमी पडणार नाही याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पर्यटन विकासासह जिल्ह्यातील प्रश्नांबाबत मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व प्रलंबित कामे मार्गी लागतील हा आमचा विश्वास आहे. सिंधुदुर्गातील अनेक विकास प्रकल्पांना विरोध करण्याचे काम शिवसेनेने केले. त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक घेणार आहेत का? आ. वैभव नाईक हे ठाकरे सरकारच्या काळात रस्ते झाले असे म्हणत असतील तर आंगणेवाडीकडे जाणारे रस्ते का केले नव्हते? मुळात सर्वात जास्त ठेकेदार हे शिवसेनेचेच आहेत त्यामुळे त्यांनी दिशाभूल करू नये. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होत आहे. ठाकरे सरकारच्या काळात जिल्ह्याचा नियोजन आराखडा कपात होवून 170 कोटीवर आला, हेच यांचे कर्तुत्व असा टोला राजन तेली यांनी लगावला. शासकीय मेडीकल कॉलेज मंजूर केलात ही चांगली बाब आहे, पण आज तेथील परिस्थिती काय आहे याचे अवलोकन करा. प्रत्येक विकास कामात अडचणी आणण्याचे काम शिवसेनेने केले. ना. राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टिका करण्याचा अधिकार सेनेला नाही. खा. राऊत आणि आ. वैभव नाईक यांची दुसरी टर्म आहे मग आंगणेवाडीत रस्ते, टॉयलेट आदी सुविधा का दिल्या नाहीत. आता मात्र पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अद्ययावत टॉयलेट, लॉकरची सुविधा, चेंजींग रुम अशा सर्व घटकांसाठी व्यवस्था आंगणेवाडीत सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून केल्या जाणार आहेत. आंगणेवाडीप्रमाणेच इतर तीर्थक्षेत्रांचाही विकास केला जाणार आहे. खा. राऊत, नाईक यांनी सोनवडे घाटाबाबत एवढ्या पत्रकार परिषदा घेतल्या पण घाटाचे काम पुढे सरकले का असा सवाल तेली यांनी केला. आ. वैभव नाईक यांनी राणेंवर केलेल्या टिकेवर उत्तर देताना राजन तेली म्हणाले वैभव नाईक हे अपघाताने झालेले आमदार आहेत, राणेंवर टिका करण्याची त्यांची कुवत नाही. एवढे होते तर त्यांना ठाकरे यांनी पालकमंत्री पद किंवा एखादे महामंडळ का दिले नाही असा टोला तेली यांनी लगावला. भाजपची वाढती ताकद पाहून राऊत, नाईक यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते आमच्यावर टिका करत असल्याचे तेली म्हणाले. कणकवलीत भाजपचे 24 हजार स्क्वेअर फुटचे 3 मजली प्रशस्त जिल्हा कार्यालय होणार असून त्याचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंगणेवाडी येथील सभेत झाल्याचे राजन तेली यांनी सांगितले.