Advertise here + 91 9322570331

सौ. महाMtb

बिबट्यांची पुन्हा निसर्गात मुक्तता

तीन बिबट्यांची सुटका होणार

मुंबई – नाशिकमधील मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांमधून पकडून बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त (नॅशनल पार्क) दाखल केलेल्या बिबट्यांची पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात येणार आहे. पाच पैकी तीन बिबट्यांना पुन्हा नाशिकमध्येच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये नाशिक वन विभागाचे अधिकारी मुंबईत येऊन या बिबट्यांना ताब्यात घेतील.

नाशिकमधील दारणा नदीच्या १२ किमीच्या परिसरातील ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये डिसेंबर, २०१९ पासून मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे. या संघर्षामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आजवर ५ मानवी मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात नाशिक पश्चिम आणि सिन्नर वन विभागाने एकूण १३ बिबटे पकडले आहेत. यामधील पाच बिबट्यांना बोरिवली नॅशनल पार्कमधील ‘बिबट्या निवारा केंद्रा’त पाठविण्यात आले होते. यामध्ये दोन प्रौढ नर-मादी आणि आठ ते दीड-दोन वर्षांपर्यतच्या तीन नर पिल्लांचा समावेश आहे. यामधील तीन बिबट्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीने नॅशनल पार्कमधील ‘बिबट्या निवारा केंद्रात’ पाठविण्यात आलेल्या पाच बिबट्यांपैकी तीन बिबट्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती नाशिक पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. यामध्ये दोन नर पिल्ले आणि एक प्रौढ मादीचा समावेश असून येत्या दोन दिवसांमध्ये हे बिबटे ताब्यात घेऊन त्यांना नाशिकमधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आता नॅशनल पार्कमधील निवारा केंद्रात नाशिकहून आणलेले दोन नर बिबटे शिल्लक राहणार आहेत. हैद्राबादच्या ‘सेन्टर फाॅर सल्युलर अॅण्ड माॅलेक्युलर बायोलाॅजी’ मधून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिकमधील बिबट्याच्या मानवी हल्ल्यांसाठी प्रौढ नर बिबट्या कारणीभूत असल्याची माहिती मिळाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यांत मृत पावलेल्या चार व्यक्तींच्या शरीरावर लागलेली बिबट्याची लाळ तपासून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमधील त्या दोन नर बिबट्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here