


शारदीय नवरात्राला प्रारंभ झाला आहे. आंबोली टाईम्स या वेबपोर्टलवरती स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी नारीसन्मान ही लेखमाला सुरू करण्यात आली आहे. त्या लेखमालेतील ‘एकविसाव्या शतकातील सरस्वती : डॉ. कल्पना आठल्ये’ हा लेख…
शारदीय नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या जागरणाचा काळ. स्त्री जशी दुर्गा, काली, ब्रह्मचारिणी या रुपांमध्ये दिसते तसेच ती सरस्वती हे एक रूप. दोन दिवसांनी सरस्वती आवाहन आहे. दसऱ्याच्या दिवशी पाटीची, सरस्वतीची पूजा करतो. पण साक्षात सरस्वती मानवी रुपात पृथ्वीतलावर वास करत असते. असेच देवी शारदेचे एक रूप म्हणजे डॉ. कल्पना आठल्ये.
डॉ. कल्पना आठल्ये यांचे शिक्षण पुणे इथे पूर्ण झाले. त्या एमए, बीएड, नेट, सेट, पीएचडी पदवी प्राप्त आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात डॉक्टरेट प्राप्त केली आहे. त्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ( रत्नागिरी ) प्राध्यापक असून मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विषयाकरिता पीएचडी मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहे.

मला प्रसन्न वदन असणाऱ्या विद्यादान हाच वसा असलेल्या शारदेचा भास डॉ. कल्पना आठल्ये मॅडम यांना पाहून होतो. माझी आणि आठल्ये मॅडम यांची भेट गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाली. अर्थातच, शिक्षणासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय निवडण्यामागील मुख्य कारण होते तेथील सक्रिय संस्कृत विभाग. त्यामुळे अर्थातच महाविद्यालयात गेल्यावर संस्कृत तासिकेकची ओढ होती. पहिल्या दिवशी दुसरी तासिका संस्कृतची होती. पहिलाच दिवस, नवीन ठिकाण यामुळे बावरलेली अवस्था होती, पण आठल्ये मॅडम यांच्या प्रसन्न प्रवेशामुळे भीती, बावरलेपण कुठच्या कुठे निघून गेले. आजही अगदी करिअरसंदर्भातील चलबिचलता असली तरी मी निःसंकोचपणे मॅडमना फोन करते. मला त्यांच्याशी बोलून मोकळं वाटतं. पण, ही भावना मनामध्ये निर्माण होण्यासही गुरूदेखील तेवढ्याच ताकदीचा हवा. मुळात, गुरू म्हणजे जो विद्यार्थ्याचे उन्नयन करतो, त्यांना योग्य दिशा दाखवतो तो गुरू. आणि आठल्ये मॅडम मला गुरू या स्थानी योग्य आहेत असे वाटते.
आठल्ये मॅडम यांचं विद्यार्थ्यांप्रति असणारं प्रेम महाविद्यालयीन काळ संपल्यानंतरही कमी होत नाही. संस्कृत दिन, कालिदास समारोह, त्यानिमित्त असणाऱ्या स्पर्धा, ‘झेप’मधील प्रदर्शन, प्रथम वर्षाच्या मुलांचा स्वागत कार्यक्रम, तृतीय व पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या मुलांचा शुभेच्छा समारंभ अशा अनेक लहान-मोठ्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून घेण्यात आठल्ये मॅडम यांचा हातखंडा आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य संधी देण्याचं कौशल्य आठल्ये मॅडम यांच्याकडे आहे. पुणे, संगमनेर, मुंबई, नागपूर याठिकाणी होणाऱ्या शोध निबंध वाचन स्पर्धा, आंतरविद्यापीठीय आविष्कार शोध निबंध स्पर्धा यांसारख्या स्पर्धांमध्ये संस्कृत विभाग सक्रिय सहभागी होऊन यशस्वी झाला तो आठल्ये मॅडम यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळेच. राज्य नाट्य स्पर्धेतही उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळाली.

सद्वर्तन, विद्वता, शिकवण्यातील हातखंडा, शिष्यांमध्ये प्रिय असणे या गुरुच्या श्रेष्ठ गुणांचे उत्तम उदाहरण म्हणजे आठल्ये मॅडम. संस्कृत विषयावरील त्यांची पकड, संस्कृत विषयाचा असणारा व्यासंग, २२ हून अधिक वर्षे शिकवण्याचा अनुभव, अनेक शोध निबंधांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचन, विविध सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या, संस्कृत भारतीच्या विविध जबाबदाऱ्या एवढ्या उच्च स्थानी असूनही कोणताही दिखाऊपणा किंवा गर्व नाही. विद्यार्थ्यांशी बोलताना अगदी त्यांच्याशी समरस होऊन बोलणे, विद्वत जनांमध्ये विद्वत्तापूर्ण बोलणे, वेगवेगळ्या भूमिकेशी एकरूपता साधणे ही कौशल्ये आठल्ये मॅडम यांच्याकडे सहजगत्या आहेत. खूप कमी लोकांना हे कौशल्य साधता येते असे मला वाटते.

आठल्ये मॅडम विद्यार्थ्यांच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांच्या सोबत असतात. विद्यार्थ्याला शिकवणं असो, त्याचे शंका निरसन भले तो संकटात जरी असेल तरीही मॅडम योग्य साहाय्य व मार्गदर्शन करतात. त्या एवढ्या तन्मयतेने शिकवतात की विद्यार्थी ते ज्ञान विसरू शकत नाही. जणू सरस्वती बालकाला आपल्या अंकावर बसवून शिकवते आहे. पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञान व संस्कार मॅडम देत असतात.
डॉ. कल्पना आठल्ये मॅडम यांचे शैक्षणिक कार्य, त्यांची विद्वत्ता, अभ्यास पाहिल्यावर देवी शारदेची आठवण होऊन हात जोडल्याशिवाय राहत नाहीत.
• वसुमती करंदीकर
